प्राचीन भारतीय शास्त्रज्ञ | Prachin Bhartiya Shastradnya

विद्यार्थीमित्रांनो आजच्या या लेखात आपण आपल्या देशात होऊन गेलेले Prachin Bhartiya Shastradnya आहेत त्याच्या संबंधी माहिती पाहणार आहोत.

प्राचीन भारतीय शास्त्रज्ञ | Prachin Bhartiya Shastradnya

आर्यभट्ट पहिला

आर्यभट्ट पहिला
आर्यभट्ट पहिला

इसवी सनाच्या पाचव्या शतकात भारतात होऊन गेलेला थोर खगोलशास्त्रज्ञ व गणिती. यांचे जन्मवर्ष इ. स. ४७६ मानले जाते. ‘भारतीय खगोलशास्त्राचा जनक’ मानला गेलेला हा थोर शास्त्रज्ञ ‘आर्यभट्टीय’ या खगोलशास्त्रावरील सुप्रसिद्ध ग्रंथामुळे अजरामर झाला आहे. सूर्य पृथ्वीभोवती फिरत नाही, तर पृथ्वी आपल्या आसाभोवती फिरत फिरत सूर्याभोवतीही फिरते, हे याने प्रतिपादन केले.

वराहमिहीर

वराहमिहीर
वराहमिहीर

खगोल, गणित व फलज्योतिष या तीनही शास्त्रांवर प्रभुत्व असलेला हा थोर शास्त्रज्ञ सम्राट विक्रमादित्याच्या नवरत्नांपैकी एक गणला जातो. याचे जन्मवर्ष इ. स. ४९० हे मानले जाते. ‘पंचसिद्धान्तिका’, ‘बृहज्जातक’, ‘वाराहीसंहिता’ हे याचे सुप्रसिद्ध ग्रंथ होत. ‘वाराहीसंहिता’ या ग्रंथास ‘बृहत्संहिता’ म्हणूनही ओळखले जाते. ‘पंचसिद्धान्तिका’ या ग्रंथात त्याने पौलिश, रोमक, वसिष्ठ, सौर व पैतामह या ज्योतिषशास्त्रविषयक पाच महत्त्वपूर्ण सिद्धान्तांचा ऊहापोह केला आहे. ‘बृहत्संहिता’ या ग्रंथात त्याने ग्रीक व भारतीय या दोन्ही फलज्योतिषशास्त्रांचा उत्कृष्ट समन्वय साधला असून ग्रीकांच्या बारा राशींच्या कल्पना व कुंडली मांडून भविष्य सांगण्याची रीत यांचा भारतास परिचय करून दिला.

ब्रह्मगुप्त

ब्रह्मगुप्त
ब्रह्मगुप्त

इ. स. ५९८-६६५ हा याचा काल मानला जातो. हर्षवर्धनास समकालीन असलेला हा थोर भारतीय शास्त्रज्ञ ‘ब्राह्मस्फुटसिद्धान्त’ या ग्रंथाचा कर्ता गणला जातो. गुरुत्वाकर्षणाचा सिद्धान्त मांडणाऱ्या न्यूटनचा आज मोठा गौरव केला जातो; परंतु पृथ्वीच्या ठिकाणी आकर्षणशक्ती असल्याचे ब्रह्मगुप्ताने न्यूटनपूर्वी कित्येक शतके अगोदर प्रतिपादन केले आहे.

भास्कराचार्य

भास्कराचार्य
भास्कराचार्य

इ. स. १११४-११७५ हा याचा काल गणला जातो. याच्यापूर्वीही भास्कराचार्य याच नावाचा एक शास्त्रज्ञ होऊन गेल्याने याचा उल्लेख दुसरा भास्कराचार्य असा करणे श्रेयस्कर. ‘सिद्धान्तशिरोमणी’ हा याचा महत्त्वपूर्ण ग्रंथ होय. याचा ‘लीलावती’ हा ग्रंथ जगप्रसिद्ध असून तो सिद्धान्तशिरोमणी या ग्रंथाचाच एक भाग वा प्रकरण गणले जाते. यामध्ये एकवर्ण समीकरणे, अनेकवर्ण समीकरणे, वर्ग वर्गमूळ, घन-घनमूळ, व्यवहारी अपूर्णांक, त्रिकोणाचे क्षेत्रफळ इत्यादींचे सुंदर विवेचन काव्यमय भाषेत केलेले आहे. ‘शून्यलब्धी’च्या तत्त्वाचा शोध ही याची महत्त्वपूर्ण कामगिरी होय.

कणाद

कणाद
कणाद

पुढे कित्येक शतकांनंतर डाल्टनने मांडलेली व आधुनिक विज्ञानाने डोक्यावर घेतलेली ‘परमाणु’ कल्पना मांडणारा थोर भारतीय शास्त्रज्ञ. ‘वैशेषिकदर्शन’ हा याचा सुप्रसिद्ध ग्रंथ होय. विश्वाची निर्मिती परमाणूंपासूनच झाली असून सर्व पदार्थांचे मूळ परमाणूतच आहे, असे याने प्रतिपादन केले.

नागार्जुन

नागार्जुन
नागार्जुन

इसवी सनाच्या दुसऱ्या शतकात होऊन गेलेल्या या थोर भारतीय शास्त्रज्ञास ‘भारतीय रसायनशास्त्राचा जनक’ असे म्हटल्यास ते वावगे ठरणार नाही. ‘सिद्धनागार्जुन’ हा याचा रसायन- शास्त्रावरील महत्त्वपूर्ण ग्रंथ होय. रसायनशास्त्रावर महत्त्वपूर्ण संशोधन करणारा थोर वैद्यक म्हणूनही तो प्रसिद्ध होता.

सुश्रुत

सुश्रुत
सुश्रुत

‘सुश्रुतसंहिते’चा हा जनक इ. स. पूर्व पाचव्या शतकात होऊन गेला असे मानले जाते. सुश्रुतसंहितेत याने अकराशेहून अधिक रोगांची चर्चा केली असून त्यांची लक्षणे दिली आहेत व त्यांवरील उपायही सांगितले आहेत. आश्चर्य वाटण्याची गोष्ट म्हणजे मोतीबिंदू, हर्निया इतकेच नव्हे, तर सध्या प्रचलित असलेल्या सिझरीन यांसारख्या शस्त्रक्रियांची व त्यासाठी आवश्यक असलेल्या उपकरणांची माहितीही त्याच्या ग्रंथात आढळते.

चरक

चरक
चरक

वैद्यकशास्त्रावरील जगप्रसिद्ध ‘चरकसंहिता’ या ग्रंथाचा जनक. याने लिहिलेल्या चरकसंहितेत गर्भधारणा, गर्भाची वाढ, त्यात होणारे शारीरिक बदल, अवयवांची निर्मिती आणि त्यांचे कार्य या विषयांची माहिती आहे. हा सम्राट कनिष्काचा दरबारी वैद्य होता.

निष्कर्ष –

तर मित्रांनो हे होते आपल्या भारतात होऊन गेलेले प्राचीन भारतीय शास्त्रज्ञ. त्याचे योगदान खूप मोठे आहे. तुम्हाला या लेखात दिलेली माहिती समजली नसेल किंव्हा तुमच्या काही शंका असतील तर खाली कंमेंट करून नक्की विचारा.

 

नमस्कार विद्यार्थीमित्रांनो, मी सायली जोशी तुमचं माझ्या वेबसाईटवर स्वागत करीत आहे. मी माझ्या वेबसाईट वर एमपीएससी आणि इतर महाराष्ट्रातील होणाऱ्या स्पर्धा परीक्षा संबंधीची माहिती नियमितपणे शेअर करत असते. मी एम ए केलेला आहे. मला पाच वर्षाचा ऑनलाइन टिचिंग चा अनुभव आहे. आणि माझ्या या वेबसाईटच्या मार्फत मी मला असलेली माहिती तुमच्यासोबत शेअर करायचा प्रयत्न करत आहे.

Leave a Comment