पंचायत समितीचे अधिकार व कार्ये | Panchat Samitiche Adhikar va Karye
(१) जिल्हा परिषदेला आपल्या विकास योजना तयार करता याव्यात या दृष्टीने गटात हाती घेण्यात यावयाच्या कामांचा व विकास योजनांचा आराखडा तयार करणे.
(२) गटासाठी मिळणा-या अनुदानांमधून हाती घ्यावयाची विकास कामे व अन्य कामे यांच्या योजना तयार करणे व अशा योजना तयार करताना स्थानिक साधनसामग्रीचा जास्तीत जास्त उपयोग करण्याचा दृष्टिकोन ठेवणे.
(३) गट अनुदानातून कार्यान्वित होणारी विकास कामे व अन्य कामे यांना मंजुरी देणे, ही कामे पार पाडणे व त्यांवर देखरेख ठेवणे.
(४) गटात जिल्हा परिषदेकडून चालू असलेली विकास कामे व अन्य कामे पार पाडणे व त्यांवर देखरेख ठेवणे. (५) गटाच्या संदर्भात जिल्हा परिषदेकडून सोपविली गेलेली कामे पार पाडणे.
(६) एखादी विकासाची योजना गटक्षेत्रात हाती घेण्याबाबत जिल्हा परिषदेस शिफारस करणे.
(७) सर्वसाधारण परिस्थितीत (कायद्यांतील तरतुदींनुसार असणारे काही अपवाद वगळता) सभापती, उपसभापती, गटविकास अधिकारी वा अन्य अधिकारी यांनी घेतलेले निर्णय दुरुस्त करण्याचे वा त्यांमध्ये सुधारणा करण्याचे अधिकार पंचायत समितीस आहेत.
(८) प्रत्येक तिमाहीस पंचायत समितीच्या सभांचा संक्षिप्त कार्यवृत्तान्त जिल्हा परिषदेस सादर करणे.
अखत्यारीतील विषय
महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम, १९६१ च्या परिशिष्ट २ मध्ये पंचायत समितीच्या अखत्यारीतील विषयांची यादी दिली आहे. त्यांतील महत्त्वाचे विषय सर्वसाधारणपणे खालीलप्रमाणे मांडता येतील-
(१) कृषी: खरीप आणि रबी पिकांच्या मोहिमा ; पडीक जमीन लागवडीखाली आणण्यास उत्तेजन; शेतीसुधारणा व आधुनिकीकरण; सुधारित मशागतीची प्रात्यक्षिके; फळे व भाजीपाला उत्पादनात वाढ घडवून आणणे; धान्य कोठारे वा गोदामे बांधणे व त्यांची देखरेख करणे; खते, शेतीची अवजारे इत्यादींचे वाटप करणे; पीकस्पर्धा आयोजित करणे; सुधारित बी-बियाणे मागविणे व त्यांचे वाटप करणे.
(२) पशुसंवर्धन व दुग्धविकास: पशुसंवर्धन व त्यांच्या उत्तम जातींच्या पैदाशीस उत्तेजन देणे; सुधारित जातींच्या कोंबड्या, मेंढ्या यांचे वाटप करणे; जनावरांची प्रदर्शने भरविणे व दुग्धविकासास उत्तेजन देणे इत्यादी..
(३) समाजकल्याण : मागासवर्गीयांच्या आर्थिक उन्नतीच्या दृष्टीने मागासवर्गीय शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीविषयक गरजा पूर्ण करण्यासाठी कर्जरूपाने आर्थिक साहाय्य वा सबसिडी देणे, विमुक्त जातीच्या लोकांना चरखे पुरविणे.
- अस्पृश्यतानिर्मूलन : हरिजन-सप्ताह, झुणका- भाकर कार्यक्रम, सवर्ण हिंदू व हरिजन यांमधील विवाहांना उत्तेजन.
- कल्याणाचे कार्यक्रम : बालवाड्या स्थापन करणे, मागासवर्गीयांसाठी करमणुकीचे कार्यक्रम आखणे, संस्कार केंद्रे स्थापन करणे, विमुक्त जातीच्या लोकांना कपडे पुरविणे, मागासवर्गीयांना घरे पुरविणे, पिण्याच्या पाण्यासाठी विहिरींची सोय करणे इत्यादी.
(४) शिक्षण: प्राथमिक शाळांसाठी इमारती बांधणे व त्यांची देखभाल करणे; प्राथमिक शाळांसाठी क्रीडांगणे, खेळांचे साहित्य, प्राथमिक शाळांचे व्यवस्थापन इत्यादी.
(५) आरोग्य व वैद्यकीय सेवा: ग्रामीण वैद्यकीय सेवा केंद्रे, औषधपेट्यांची व्यवस्था, ग्रामीण गटार योजना, ग्रामीण पाणीपुरवठा इत्यादी.
(६) इमारती व दळणवळण: खेड्यातील रस्ते तयार करणे, त्यांची देखभाल करणे, दुरुस्ती करणे; खेड्यातील रस्त्यांवर पूल उभारणे; रस्त्यांच्या दुतर्फा झाडे लावणे इत्यादी. यांशिवाय-
(७) समुदाय विकास
(८) समाजशिक्षण
(९) ग्रामीण गृहबांधणी
यांसारखे विषय पंचायत समितीच्या अखत्यारीत येतात.
Leave a comment